⚡मालवण ता.१०-: सिंधुधुदुर्गातील एका व्यावसायिकाला शासकीय करखात्याकडून जिएसटी बाबत टपालाद्वारे पाठवल्या गेलेल्या ‘लाखो रूपयांची थकबाकी भरणा करण्याची मागणी करणाऱ्या’ नोटीसी बाबत त्या सजग व्यावसायिकाला संशय आल्याने त्याने त्या डिमांड नोटिशीवर स्वाक्षरी असणाऱ्या अधिकाऱ्याशी थेट संपर्क करून चौकशी केल्यावर ‘ती’ नोटिस ‘त्या’ अधिकाऱ्याने पाठविलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्यावसायीकाच्या याच सजगपणामुळे आणि चौकस वृत्तीमुळे त्याला काही लक्ष रूपयांना टोपी घालण्याचा व्हाईटकॅालर कट उधळला गेला आहे. त्यामुळे व्यापारी व व्यावसायिक वर्गाने कर खात्या कडून टपालाने आलेल्या नोटिसां बद्दलही खात्री करावी आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
करभरणा करण्यासंबंधी किंवा अन्य शासकीय किंवा न्यायीक कामासाठी सुद्धा आता इमेल, वॅाटसअप, एसएमएस किंवा तत्सम आधुनिक संपर्क साधनांचा उपयोग आता शासनमान्य आहे. हळूहळू या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य करदाते प्रतिसादही देत आहेत, टेक्नोसॅव्ही होत आहेत. पण याच बरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच वापरकर्त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवून लाखो रूपये बॅंक खात्यातून उडविण्याच्या गोरखधंद्याच्या बातम्या आता सर्वांच्याच अंगवळणी पडल्या आहेत.पण तरीही कोणत्याही बाबतीत रितसर टपालाद्वारे आलेल्या नोटिशींची दहशत अजूनही जबरदस्त टिकून आहे. सर्वसामान्य व्यापारी- व्यावसायीकांच्या याच भयग्रस्त मानसिकतेचा गैरवापर करून त्याला काही लाखाचा आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न काही जणांकडून संगमताने होत असल्या बाबतची तक्रार सिंधुदुर्गातील एका व्यावसायिकाने महासंघाकडे दाखल केली आहे. या बाबत सर्व संबंधीतांकडून माहिती व तज्ञांच्या सल्ल्याने पुढील कारवाई बाबतची पावले महासंघा मार्फत उचलली जात आहेत, असे प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे.
आता सर्व करदात्यांनी सावधानता बाळगणे अपरिहार्य आहे. व्यापाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्याकडून खातरजमा करूनच पुढची पावले उचलावीत. केवळ व्यापाऱ्यांनीच नव्हे तर सर्व नागरिकांनीही कसल्याही बाबतीत कोणाकडूनही आलेल्या मागणी, वसूली किंवा अन्य आर्थिक बाबी संबंधीच्या नोटिसांची खातरजमा संबंधीत स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलून करून घ्यावी आणि नंतरच त्यावरील पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत अशी खातरजमा केल्या शिवाय कोणत्याही स्वरूपात आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन प्रसाद पारकर यांनी केले आहे.
