⚡मालवण ता.१०-: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे तारकर्ली येथील स्कुबा डायविंग सेंटर (ईसदा) येथे राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी १० अशा एकूण ३६० तरुण- तरुणींना जलपर्यटन व पाण्याशी निगडित मोफत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. दि.१९ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. या शिबिरासाठी ईसदातील २५ तज्ज्ञ स्कुबा डायव्हर्सची टीम सज्ज आहे. प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्गातील १० जणांची निवड १३ जून रोजी ईसदा-तारकर्ली येथे होणार आहे. त्यांना १९ जून ते ३ जुलै या कालावधीत ईसदा येथे प्रशिक्षण दिले जाईल.
जलपर्यटन क्षेत्रात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाच्या संकल्पनेतून व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुरस्कृत राज्यातील तरुण- तरुणींसाठी कालबद्ध कार्यक्रमांतर्गत जल पर्यटन आणि जीवरक्षक प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले आहे. १० पैकी पाचजणांना जीवरक्षक आणि पॉवर बोट हँडलिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. तर इतर पाचजणांना रेस्क्यू स्कुबा डायव्हिंग शिकविले जाणार आहे. चार कोर्सेस प्रशिक्षणात घेतले जाणार आहेत. अन्य जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील दहा तरुण- तरुणींच्या चमूची अंतिम निवड करण्यासाठी त्या जिल्ह्यातील स्थळ ठरवून देण्यात आले आहे.
ईसदाची टीम सज्ज इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्टस् अर्थात ईसदातील तज्ज्ञ स्कुबा डायव्हर्स प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दहाजणांची निवड निश्चित करणार आहेत. धीरज चोपडेकर, सुरज भोसले, जितेश वस्त, विवान राणे, थॉमसन फर्नांडिस, काशिनाथ परब, संकेत गावडे, जयवंत बांदेकर, ऋतुज देऊळकर, हर्षाली मांजरेकर, अंतोन काळसेकर, घनश्याम मोरजे, संतोष परब आदी तज्ज्ञ स्कुबा डायव्हर्सची टीम यासाठी कार्यरत राहणार आहे. इच्छुकांनी धीरज चोपडेकर, ९४०५८१५५७० आणि सुरज भोसले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
