⚡मालवण ता.१०-: कुडाळ नगरपंचायतीत केवळ एका जागेमुळे नगराध्यक्ष पदासाठी तडजोड करावी लागली. त्यामुळे मालवण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह संपूर्ण बहुमत मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. येत्या काळात जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्या, त्यांची सोडवणूक करा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे बोलताना केले.
दरम्यान, ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावागावात “गाव संपर्क अभियान” सुरु करण्याची सूचना खा. राऊत यांनी केली.
मालवण शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी लिलांजली सभागृहात खा. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी व्यासापीठावर आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार केणी, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले, संघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. आमदार, खासदार यांच्यावर अवलंबुन न रहाता जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांनी महिन्यातून दोनवेळा प्रत्येक गावात जाऊन संपर्क वाढवावा. आगामी वर्ष देशासह राज्यासाठी परिवर्तनाचे वर्ष आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने सावध राहा. आपल्यासाठी नगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक देखील महत्वाची आहे.
सिंधुदुर्गात आपल्याकडे जिल्हा परिषद नसल्याने निधी देण्यात आम्ही कमी पडतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश येत नाही. आज मिंधे, भाजपा सरकारच्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दारू २० – २५ रुपयांना मिळते. पण रॉकेलचा भाव १०० रुपये होऊनही ते पण मिळत नाही. कोकणात ५० % गावात
पिण्याचे पाणी नाही. रेशनवर जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. हे विषय जनतेपर्यंत न्या.
त्यासाठी गावागावतील शिवसैनिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
बूथ कमिट्या सक्षम करणे आणि जिवंत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदर्श घ्या. त्यांचे बाहेरच्या राज्यातील केंद्रीय मंत्री आज बूथ कमिट्या जिवंत ठेवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात येत आहेत. एवढे मोठे नेते पक्ष संघटना सांभाळण्यासाठी येतात. यावरून संघटना बांधणीसाठी तो पक्ष किती सतर्क आहे, याचा विचार करा, असे खा. विनायक राऊत म्हणाले.
अनेक आमदार, खासदार पक्षातून गेले असले तरी सामान्य मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मेरिटवर विधानसभा जिंकू शकत नाही, हे भाजपाला कळून चुकले आहे. म्हणून संपूर्ण राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र आखले गेले आहे. यासाठी एम आय एम च्या लोकांना हाताशी धरून लव्ह जिहाद, औरंगाजेबचे भूत भाजपा आणू पाहत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एकही जातीय दंगली होऊ शकल्या नाहीत, असे सांगून कोल्हापूर, संगमनेर, संभाजीनगर येथील दंगली भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी करून जाती जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचे प्रकार राज्यात भाजपा कडून सुरु असल्याचे खास. राऊत म्हणाले.
आमदार वैभव नाईक यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टिका केली. शिवसेनेतील फुटीला एक वर्ष पूर्ण झाले. अनेक आमदार, खासदार गेले. पण सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सर्वसामान्य लोकांची नाळ शिवसेनेबरोबर जोडली आहे. मालवण शहरात अनेकाना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण सत्ता जाऊन देखील अनेक जण शिवसेने सोबत आहेत. आपल्या विरोधात उदय सामंत, रवी नारायण, नारायण राणे यांच्यासारखे मंत्री आहेत. त्यामुळे गाफिल राहू नका. कुडाळमध्ये दोन दिवसांपूर्वी शासकीय कार्यक्रम घेतला. चार- चार हजार रुपये गाडीला देऊनही या कार्यक्रमाला लोक जमले नाहीत.
आज मालवण मध्ये मागील नऊ वर्षात आपण अनेक कामे केली आहेत. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आचरा, विरण, कुडाळ तीन ठिकाणहून लाईट पुरवठा केला आहे. शहरात कामाच्या बाबतीत आपण कमी पडलो नाहीत. आपल्याकडे तीन तीन, चार चार वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत. मात्र कागदावर पदाधिकारी नको. ऍक्टिव्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. युवा सेनेत नविन मंडळी आली आहेत. त्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे. निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे ताकदीने नगरपालिका जिंकण्यासाठी काम करूया. मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडूया, असे ते म्हणाले.
