मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी – अरविंद मोंडकर

⚡मालवण ता.३१-: नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनामधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र जनतेच्या हृदयातील दैवतांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असल्याने शिंदे- फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असून मुख्यमंत्री शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, असे राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी दगड, शेणाचे गोळे सहन करून मोठा प्रमाणात स्वजीवनाचा लोकांसाठी त्याग केला आणि ज्या अहिल्यादेवींनी आपल्या स्व:कर्तृत्वाच्या जोरावर राज्यकारभाराचा आदर्श असा वस्तुपाठ घालून दिला अशा थोर व्यक्तीचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापी सहन करणार नाही. ज्यानी हे कृत्य केले त्या लोकांच्या बुद्धीची आम्हाला कीव येते तसेच आपल्या बहुजनांच्या बाबतीत हीन दर्जाच्या मानसिकतेचा आम्ही निषेध करत आहोत, असेही अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

पुतळे हटवण्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्याची थोडी जाणीव असेल तर शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आपल्याला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page