पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे अभिवचन
⚡बांदा ता.१८-: भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना तिलारी कालव्यातील पाणीपुरवठा बंद केल्याने मडुरा दशक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी तिलारी कालवा कार्यालयावर धडक दिली. परिसरात पाणी संकट असताना अचानक पाणी सप्लाय बंद केल्याने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना जाब विचारला. ओटवणे भागात कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे अभियंता कोरे यांनी सांगितले. गुरुवार संध्याकाळ पासूनच कालव्यातून रोणापाल पर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे अभिवचन अभियंता कोरे यांनी दिले.
तिलारी कालव्यातून महिनाभरापूर्वी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाई बर्यापैकी आटोक्यात आली होती. मात्र, दुरुस्तीच्या कामांसाठी पंधरा दिवसातच हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सध्या पाणी पातळी बरीच खाली गेल्याने परिसरात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
रब्बी पिकांसह बागायतींना पाणी देणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील कालवा कार्यालयात धडक दिली. कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना पाणीपुरवठा बंद केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. आज संध्याकाळ पासूनच पाणीपुरवठा सुरु करण्याचे अभिवचन कोरे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. रविवार पर्यंत पाणी रोणापाल गावापर्यंत पोहचेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, संचालक दत्ताराम परब, रोणापाल उपसरपंच कृष्णा परब, माजी सरपंच उदय देऊलकर, ग्रा. पं. सदस्य योगेश केणी, अरुण पंडीत, सागर गोठसकर, अर्जुन देऊलकर, अमोल शेगडे आदी उपस्थित होते.
