बांदा कालव्याचे अचानक पाणी झाले कमी;परिणामी बांदा वासियांची तहान अपुरी;पुरेसे पाणी न सोडल्यास कालव्यात बसून आंदोलन करण्याचा जावेद खतीब यांचा इशारा
बांदा ता.११-: वाढत्या पाण्याच्या मागणीनुसार मोपा (गोवा) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेले पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आले आहे. याचा परिणाम बांदा शहर ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर झाला आहे. शहरातील खासगी विहिरीच्या पाणी पातळीत देखील मोठी घट झाल्याने परिसरात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे. उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्याची पाहणी करत तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाणी न सोडल्यास कालव्यात बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेतर्डे पाणी सोडण्यात आले होते. सुरुवातीला पाण्याच्या विसर्गाचा वेग हा अत्यंत कमी होता. मात्र कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत न पोहोचल्याने इन्सुली व रोणापाल ग्रामस्थांनी आंदोलन देखील केले होते. रोणापाल ग्रामस्थांनी सावंतवाडी कार्यालयासमोर अनोखे गळफास आंदोलन केले होते. याची दखल घेत कालवा विभागाने गोव्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत पाण्याचा विसर्ग हा दुप्पट वेगाने वाढवीला होता. यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती.
बांदा ग्रामपंचायतची नळपाणी योजनेची विंधन विहीर ही सटमटवाडी येथे कालव्यालगत आहे. कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे विहिर देखील तुडुंब पाण्याने भरून वाहत होती. कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अचानक व कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाणी नसल्याने या परिसरातील बागायती देखील करपून गेली आहे.
आज शहरातील अनेकांच्या तक्रारी आल्याने उपसरपंच जावेद खतीब यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, शैलेश केसरकर यांच्यासह तिलारी कालव्याची पाहणी केली. अनेकांच्या घरातील खासगी विहिरीची देखील पाहणी करत तीव्र संताप व्यक्त केला.
