⚡मालवण ता.१२-: अविष्कार सोशल अँड एज्यूकेशनल फाउंडेशन या संस्थेतर्फे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक कैलास राबते यांना जाहीर झाला आहे.
अविष्कार फाउंडेशनही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रा. कैलास राबते यांची निवड झाली असून याबाबतचे पत्र अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी प्रा. राबते यांना पाठवले आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जोतिबा रॉयल रिसॉर्ट, श्री क्षेत्र जोतिबा (वाडी – रत्नागिरी) ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे होणार आहे. या पुरस्काराबद्दल प्रा. राबते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
