“पारंपरिक मच्छीमार आक्रमक; कायदा हातात घेण्याचा इशारा”..

⚡मालवण ता.२३-:
देवगड येथील मच्छीमारांनी पारंपरिक मच्छीमारांवर मासे चोरीचे आरोप केल्यानंतर मालवणातील पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. अनधिकृत पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही मत्स्य विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मच्छीमारांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली. “आमच्यावर मासे चोरीचा आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत अनधिकृत मासेमारी रोखण्यात अपयश आल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृत पर्ससीन मासेमारी आणि परराज्यांतील हायस्पीड नौकांचे अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला. या नौका पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी क्षेत्रात घुसून मासळी पकडत असल्याने स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन मत्स्य विभागाला सादर केले.
देवगड येथील मच्छीमारांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत पारंपरिक मच्छीमारांनी संबंधित नौकांच्या मासेमारीचे व्हिडीओ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. संबंधित मच्छीमार ट्रॉलिंगच्या नावाखाली अनधिकृत पर्ससीन मासेमारी करत असल्याचा दावा त्यांनी केला. समुद्रात १० ते १२ वाव अंतरावर, पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी क्षेत्रात घुसून मासळी पकडली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कारवाई न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा
अनधिकृत मासेमारीविरोधात वारंवार लक्ष वेधूनही मत्स्य विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. मासळी मिळत नसल्यामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मत्स्य विभागाकडे गस्तीसाठी सुसज्ज स्पीड बोट नसल्याने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा मच्छीमार स्वतः पुढाकार घेतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असेही मच्छीमारांनी स्पष्ट केले.
यावेळी मत्स्य विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच मच्छीमारांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले. यावेळी मत्स्य परवाना अधिकारी गणेश टेमकर, मत्स्य अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते.
या आंदोलनात रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे, श्रमजीवी रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, मच्छीमार नेते विकी तोरसकर, मत्स्य व्यावसायिक तथा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, दिलीप पराडकर, सुजित मोंडकर आणि हेमंत जोशी आदी सहभागी झाले होते.
