Headlines

“आचिर्णे बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी शिवाजी विद्यापीठात पाहणी…

⚡​वैभववाडी ता.२३-:
​आचिर्णे येथे साकारण्यात येणाऱ्या प्रस्तावित जैवविविधता उद्यानाच्या उभारणीला गती प्राप्त होत आहे. वैभववाडी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भेट देत येथील बायोडायव्हर्सिटी पार्कची पाहणी केली. या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक माहिती, नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
​सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला भेट दिली. यावेळी विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या जैवविविधता उद्यानाची पाहणी करून त्याची रचना, संकल्पना आणि व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यात आली.
​विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख यांच्याकडून जैवविविधता उद्यानाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहिती शिष्टमंडळाने घेतली. उद्यानाची निर्मिती करताना वनस्पतींच्या विविध प्रजातींचे संवर्धन, त्यांचे जतन, उद्यानाचे नियोजन तसेच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबींवर यावेळी मार्गदर्शन घेण्यात आले.
​आचिर्णे येथे उभारण्यात येणाऱ्या या जैवविविधता उद्यानाच्या माध्यमातून परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच स्थानिक जैवविविधतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे निसर्गपर्यटनाला चालना मिळण्यासह पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्याचीही अपेक्षा आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील उद्यानाच्या पाहणीदरम्यान मिळालेली माहिती आचिर्णे येथील प्रकल्पाच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
​या शिष्टमंडळात वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावर्राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष कार्याधिकारी अजयकुमार सर्वगोड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, तज्ज्ञ सल्लागार वामन पंडित, प्राध्यापक गावडे, संदीप राणे, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये आणि कंत्राटदार प्रतिनिधी राजू मुणगेकर यांचा समावेश होता.

You cannot copy content of this page