Headlines

सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाच; पिंगुळीचे तलाठी एसीबीच्या जाळ्यात

कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी सायंकाळी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
तक्रारदार वकिलाने आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. संबंधित कामाच्या मोबदल्यात तलाठी खेताडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना खेताडे यांना पथकाने पकडले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दीपक माळी, पोलीस हवालदार प्रीतम कदम, महेश जगताप, नागेश खोत, योगेश मुंढे, भूषण नाईक आणि स्वाती राऊळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page