खाणकामाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करावी:मनसेचे कुणाल किनळेकर यांची मागणी..

⚡कुडाळ ता.२४-: जिल्ह्यातील काळ्या दगडखाणी आणि खनिज उत्खननाच्या ठिकाणी कथित नियमबाह्य उत्खनन व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूजलसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवू नये, यासाठी संबंधित खाणींची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्ह्यातील खाणकामाच्या पद्धतींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी १०० ते १५० फूट किंवा त्याहून अधिक खोलीपर्यंत उत्खनन केले जात असल्याचा आरोप आहे. तसेच अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेचा भूजलसाठ्यावर नेमका किती परिणाम होतो, याचा शास्त्रीय अभ्यास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्खननाच्या खोलीची तांत्रिक तपासणी करा
काही खाणींमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक खोलीपर्यंत उत्खनन होत असल्याचा आरोप करत किनळेकर यांनी मंजूर खाण आराखडे, परवानगीतील अटी आणि प्रत्यक्ष उत्खननाची खोली यांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. सहा मीटरची मर्यादा सर्व प्रकारच्या खाणींना लागू आहे किंवा नाही, याबाबत संबंधित नियम आणि परवानग्यांच्या आधारे प्रशासनाने स्पष्टता करावी, असेही त्यांनी नमूद केले.
जलसंधारणासोबत भूजलसाठ्याचाही अभ्यास आवश्यक
जिल्ह्यात जलतारा, वनराई बंधारे आणि अन्य जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी खोल उत्खनन आणि ब्लास्टिंगचा भूजलसाठ्यावर होणारा संभाव्य परिणाम तपासणे आवश्यक असल्याचे किनळेकर यांनी म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत भूजलपातळी घटल्याच्या चर्चेचा संदर्भ देत सिंधुदुर्गमध्येही भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
खाणींची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संबंधित खाणींची पाहणी करून उत्खननाच्या नियमांचे पालन, ब्लास्टिंगसाठी आवश्यक सुरक्षा उपाय आणि पर्यावरणीय परवानग्यांतील अटींची पूर्तता यांची खातरजमा करावी, अशी मागणी किनळेकर यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्व खाणी नियमांनुसार सुरू असल्याचे प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणीतून स्पष्ट करावे. तसे सिद्ध झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
गोव्याकडे होणाऱ्या खनिज वाहतुकीची चौकशी करा
सिंधुदुर्गातून गोव्याच्या दिशेने होणाऱ्या खनिज वाहतुकीत काही वाहने आवश्यक खनिज पास किंवा ई-रवाना न घेता वाहतूक करत असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे. या वाहतुकीतील गोवा नोंदणीच्या डंपर वाहनांचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. खनिज पास, ई-रवाना, रॉयल्टी, वाहनांची कागदपत्रे आणि वजनमर्यादा यांची पडताळणी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
वन्यजीव आणि भातशेतीच्या नुकसानीची चौकशी करा
ब्लास्टिंगमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याचा तसेच वन्यप्राण्यांकडून भातशेतीचे नुकसान होत असल्याचा आरोपही किनळेकर यांनी केला आहे. या तक्रारींची वनविभागामार्फत स्वतंत्र चौकशी करून खाणकामाचा संभाव्य पर्यावरणीय परिणाम आणि शेतीच्या नुकसानीची कारणे तपासावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संयुक्त पथकामार्फत तपासणीची मागणी
जिल्ह्यातील संबंधित खाणींची संयुक्त पथकामार्फत तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष उत्खननाची खोली, पर्यावरणीय परवानग्या, ब्लास्टिंगची प्रक्रिया, भूजलसाठ्यावरील संभाव्य परिणाम, खनिज वाहतूक आणि रॉयल्टी भरण्याची स्थिती यांची सखोल तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळणाऱ्या खाणींचे काम थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किनळेकर यांनी केली आहे.
भविष्यात नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आताच खबरदारी घ्यावी. नागरिकांनीही आपल्या परिसरातील संशयास्पद किंवा नियमबाह्य खाणकामाबाबत संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
खाणकाम, भूजलसाठा आणि पर्यावरण संरक्षण या मुद्द्यांवर प्रशासनाने वस्तुनिष्ठ तपासणी करून त्याचा अहवाल जनतेसमोर मांडावा, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
