नागरिकांच्या जीविताला धोका:धोकादायक खांबांबाबत पूर्वसूचना देऊनही महावितरणचे दुर्लक्ष..

⚡कुडाळ ता.२४-: तालुक्यातील पिंगुळी येथील उत्कर्षनगर परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा एक खांब जीर्ण होऊन रात्री कोसळला. हा खांब नारळाच्या झाडाला अडकलेल्या अवस्थेत असून, परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्युत वाहिनीतील खांब धोकादायक स्थितीत असल्याची पूर्वकल्पना महावितरणला देण्यात आली होती. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या खांबांची पाहणीही केली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
या परिसरात घरगुती वीजपुरवठा करणारी वाहिनी असून, स्थानिक रहिवासी निलेश प्रभू यांचे घर तसेच त्यांच्या वाहन विक्री व्यवसायातील वाहनेही येथे उभी असतात. त्यामुळे कोसळलेला खांब आणि धोकादायक स्थितीतील विद्युत संरचनेमुळे मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
या ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील आणखी दोन खांब आणि एक टॉवरही धोकादायक स्थितीत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या परिसरात बापू पिंगुळकर, घोलेकर, सुरेश प्रभू, वेतुरेकर आणि विलास भोसले यांची घरे आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने या धोकादायक खांबांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती किंवा बदल करण्याची मागणी होत आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन धोकादायक विद्युत खांब आणि टॉवर सुरक्षित करावेत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
