Headlines

पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी

वेंगुर्ला नगरपरिषदेने प्रगतिशील कामांना अधिक प्राधान्य द्यावे

वेंगुर्ला
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना वेळेत सेवा वितरण आणि लोकसहभागातून होणारी विकासकामे यांना प्राधान्य द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह (भाप्रसे) यांनी शुक्रवारी वेंगुर्ला तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान दिल्या.
पालक सचिवांनी वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जलसंधारण काम आणि नगरपरिषदेच्या विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर,तुळस जि. प. सदस्य सुजाता पडवळ, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे आरोग्य सुविधांची पाहणी :
पालक सचिवांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे भेट देऊन बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), शीतसाखळी कक्ष, औषध भांडार, प्रसूतीगृह आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाची (एनसीडी) पाहणी केली. यावेळी विविध नोंदवही तपासून आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती घेतली. आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा तसेच उपलब्ध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी लाभार्थ्यांना वयोवंदना कार्ड आणि आभा कार्डचे वितरण करण्यात आले. आरोग्यविषयक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.

मातोंड ग्रामपंचायतीत लोकसहभागातून जलसंधारणाला बळ :
यानंतर पालक सचिवांनी मातोंड ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच मयूरी वडाचेपाटकर यांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामसेवक प्रल्हाद इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच वैभवी परब, ग्रा. पं. सदस्य दिपेश परब व अन्य यावेळी उपस्थित होत्या.
मातोंड गावात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे आणि अन्य जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. गावातील बचत गट, शाळा आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या कामांमध्ये सहभाग नोंदविला आहे. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभागातून निर्माण झालेली ही चळवळ गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी ग्रामस्थांनी पालक सचिवांचे स्वागत करताना, “तुम्ही आलात आणि पाऊस पडला,” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला आणि आभार मानले. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण पालक सचिवांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, ग्रामपंचायतीतील सीएससी केंद्राला भेट देऊन तेथून पुरविण्यात येणाऱ्या विविध ऑनलाइन सेवांची आणि कामकाजाची माहिती त्यांनी घेतली.
मातोंड ग्रामपंचायतीच्या भेटीनंतर पालक सचिवांनी सावंतवाडा येथील बंधाऱ्याची पाहणी केली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, जिरविणे आणि स्थानिक जलस्रोतांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.

वेंगुर्ल्यातील ‘नमो उद्याना’चे कौतुक :
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाचीही पालक सचिवांनी पाहणी केली. उद्यानातील सुविधा आणि करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी या कामाचे कौतुक केले. उद्यानाची उभारणी अत्यंत आदर्शवत पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

१५० वर्षांची परंपरा असलेल्या नगरपालिकेने प्रगतिशील कामांना प्राधान्य द्यावे :
यानंतर पालक सचिवांनी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांच्या वितरण प्रक्रियेची माहिती घेतली. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी पालक सचिवांचे स्वागत केले. नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक प्रशांत आपटे यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती दिली.
सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला नगरपालिकेने आता प्रगतिशील कामे हाती घेऊन प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर द्यावा. नागरिकांना विविध सेवा जलद आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना पालक सचिवांनी यावेळी दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकासकामांसोबतच सेवा वितरणाची गुणवत्ता वाढविणे, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि लोकसहभागातून शाश्वत उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे या दौऱ्याच्या माध्यमातून अधोरेखित झाले.

You cannot copy content of this page