⚡सावंतवाडी ता. २३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तथा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत कु. अनिका मिथिलेश सुकी हिने गोळाफेक प्रकारात ७.२३ मीटर अंतराची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. अस्मि धीरज सावंत हिने थाळीफेक प्रकारात १७.६५ मीटर अंतराची नोंद करत द्वितीय क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनिका सुकी आणि अस्मि सावंत या दोन्ही खेळाडूंची डेरवण येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल प्रशालेतर्फे तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रशालेचे अध्यक्ष अॅड. रजुल पाटणकर यांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.”
