थर्ड पार्टी ऑडिट अहवाल सभेत मंजूर; अपूर्ण अहवालावर सिद्धार्थ भांबुरेंचा आक्षेप ,तर थर्ड पार्टी ऑडिटमध्ये काम समाधानकारक, असल्याचे झाले स्पष्ट, आता योजनेचे लवकर पूर्ण करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा;संजू परब..

⚡सावंतवाडी ता. २३-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिटचा अहवाल नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांनी केलेल्या पाहणीत योजनेतील बांधकामाचे काम समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यानुसार रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. योजनेची मुदत ८ डिसेंबर २०२६ पर्यंत असली तरी उर्वरित काम जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन नगरपरिषद प्रशासन, पीएमसी आणि ठेकेदाराकडून करण्यात आले आहे. मात्र, अहवाल सादरीकरणाच्या सुरुवातीलाच भाजप नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आक्षेप घेतला. योजनेची १४ ठिकाणी पाहणी करून अहवाल तयार करणारे सीओईपीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेडाऊ हे सभेला अनुपस्थित असल्याने अहवालाबाबत सदस्यांच्या शंकांचे निरसन कोण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अहवालातील काही पाने उपलब्ध नसल्याचा आरोप करत अर्धवट अहवालावर चर्चा कशी करायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर व ॲड. सायली दुभाषी यांनीही आक्षेप नोंदविला. सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांनी या योजनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी नागरिकांना वेळेत पाणी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगत वारंवार बैठका घेण्यापेक्षा ठोस नियोजन करून योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. योजनेची कामे रत्नागिरीतील योजनेप्रमाणे रखडू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी हस्तक्षेप करत पीएमसी व ठेकेदाराच्या अभियंत्यांना अहवाल आणि पुढील कामाचे नियोजन सभेसमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, नगरसेविका वीणा जाधव यांनी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास होत असून अपघातही घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नगरसेवक अजय गोंदावळे, नीलम नाईक, तौकीर शेख आणि आनंद नेवगी यांनीही पुढील कामे करताना योग्य नियोजन करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याची मागणी केली. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी थर्ड पार्टी ऑडिटमध्ये काम समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले असल्याने आता अधिक चर्चा न करता योजनेचे काम वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले. नगराध्यक्षा भोंसले यांनी कोल्ड मिक्सने केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या ठिकाणी हॉट मिक्सने पुन्हा काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी उर्वरित ५२ टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहा टीम नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली. प्रत्येक टीममध्ये प्लंबर, सुपरवायझर आणि अभियंते असतील. बारचार्टनुसार जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत सुमारे २७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. हेडाऊ हे निवडणुकीच्या कामामुळे सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, सदस्यांच्या अहवालासंदर्भातील शंकांचे निरसन त्यांच्याकडून करून दिले जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी सभेत दिली.”
