Headlines

‘ऑडिटर अनुपस्थित मग प्रश्न कोणाला विचारणार…?’

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा सवाल; विशेष सभा पुन्हा घेण्याची मागणी..

⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी नगर परिषदेत ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’बाबत पार पडलेली विशेष सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांत्रिक लेखापरीक्षण (टेक्निकल ऑडिट) करणारे ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथील मुख्य अन्वेषक तथा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेराऊत सभेला अनुपस्थित राहिल्याने, “विशेष सभेत प्रश्न कोणाला विचारणार?” असा संतप्त सवाल सावंतवाडी पालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी उपस्थित केला आहे.

या सभेला ॲड. निरवडेकर हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मात्र ऑनलाईन जोडणीत तांत्रिक अडचणींमुळे सभेत चाललेला संवाद सुस्पष्टपणे ऐकू येत नव्हता. त्यामुळे नळपाणी योजनेच्या या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक अहवालावर सविस्तर चर्चा होण्यासाठी ही विशेष बैठक पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका करताना सांगितले की, “सादर करण्यात आलेला तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल हा केवळ एप्रिल २०२६ पर्यंतच्या कामावर आधारित आहे. मात्र आम्ही स्वतः ९ जुलै रोजी या योजनेच्या कामात होत असलेल्या गंभीर अनियमिततेबाबत अधिकृत पत्र दिले होते. त्यामुळे एप्रिलनंतरच्या कालावधीत कामात काय अनियमितता झाली, हे या ऑडिट रिपोर्टमध्ये आलेलेच नाही.”

“योजनेत सर्व काही अलबेला आहे अशा पद्धतीने थातूरमातूर सभा घेऊन सावंतवाडीच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार चालला असून, तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” असा सज्जड इशाराही उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत आणि नळपाणी योजनेतील गोंधळाबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जनतेसमोर स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page