आम. वैभव नाईक यांचा मालवणातील कार्यक्रमात गौप्यस्फोट
⚡मालवण ता.२६-: मालवण कुडाळ मतदार संघात स्थगिती दिलेल्या शंभर कोटी निधीच्या कामांवरील स्थगिती उठवावी यासाठी आपण नवीन मुख्यमंत्र्यांना भेटलो असता त्यांनी ही कामे होणार नाहीत तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली. मात्र मी एका माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून आमदार झालो आहे. त्यावेळीही धमक्या दिल्या गेल्या. त्यास न घाबरता प्रेरणा घेत आमदार झालो. त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी ही मला जास्त ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे आपल्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने मालवण शिवसेना शाखा येथे आज सायंकाळी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, महिला आघाडीच्या सेजल परब, पूनम चव्हाण, दिपा शिंदे, कोळंब सरपंच सिया धुरी, नंदू गवंडी, उमेश मांजरेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, आव्हाने पेलण्याची ताकद तुमच्या शुभेच्छामुळे मिळते. मला घडवण्यामध्ये मालवणच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचा विश्वास महत्वाचा आहे. राजकारण हे पदे घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आहे मंत्री पदाने हुलकावणी दिली तरी तुम्ही शिवसेनेत कसे असा प्रश्न मला विचारला जातो मात्र, मला आजपर्यंत जी पदे मिळाली ती शिवसेने मुळेच मिळाली आहेत असेही आमदार नाईक म्हणाले.
शिवसेनेतून आमदार फुटले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला फोन केला मी त्वरित ठाकरे याना भेटलो. उद्धव ठाकरें सोबत व शिवसेने सोबत माझ्या माणसांसोबत राहण्याची भूमिका मी त्यावेळी घेतली. या पक्षाने मला आमदारकी दिली त्यामुळे या पक्षासोबतच राहण्यासाठी माझे मन माझ्या पाठीशी राहील. आज मला व माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात माझ्यावर एसीबी चौकशी लावली जाते मात्र, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे मी दबावाखाली येण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यातही माझ्या हातून कोणतेही चुकीचे काम होणार नाही, माझ्याकडील एक रुपया जरी गैर मार्गाचा असला तर मला फासावर लटकवा असे आमदार नाईक यांनी सांगितले. आडनावाच्या बदनामी प्रकरणी शिक्षा झाल्याने राहुल गांधींची खासदारकी रद्द होते मग कणकवलीच्या नगराध्यक्षावर कारवाई का होत नाही. महाराष्ट्र हा लढणारा आहे मालवण तालुका नेहमी शिवसेना व समाजवादी यांच्या पाठीशी राहिला आहे. राज्यात पून्हा ठाकरेंचीच सत्ता येईल असेही आमदार नाईक म्हणाले.
मालवण नगरपालिकेत शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षातील सत्ता काळात आपण अनेक कामे केली. तसेच शिवराजेश्वर मंदिर सुशोभीकरण, नवीन बंदर जेटी बांधली तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेटी बांधण्यात येणार असून शहरात मत्स्यालय व सुशोभीकरणाची कामे होऊ घातली आहेत. देवबाग तारकर्लीला नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची कामेही मालवण तालुक्यात सर्वाधिक झाली आहेत, तौक्ते वादळात मालवण तालुक्यात ५६ कोटींची नुकसान भरपाई दिली. एलईडी मासेमारी विरोधातील आपली भूमिका कायम राहणार आहे, असेही आम. नाईक म्हणाले.
यावेळी बोलताना हरी खोबरेकर म्हणाले, आमदार नाईक एकनिष्ठ राहिले, त्यांनी गद्दारीचा डाग घेतला नाही. आज काहीजण आमदारांना मारण्याच्या धमक्या देत आहेत, मात्र आमदारांच्या केसालाही धक्का लावलात तर मालवणात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी मंदार ओरसकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे स्वागत केले.
यावेळी तपस्वी मयेकर, पंकज सादये, नरेश हुले, राहुल परब, सन्मेष परब, तृप्ती मयेकर, गणेश कुडाळकर, मनोज मोंडकर, अनंत पाटकर, सिद्धेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगूत, यशवंत गावकर, मोहन मराळ, दिलीप घारे, करण खडपे, आर्या गावकर, निनाक्षी मेतर, स्मृती कांदळगावकर, किरण वाळके, महेश जावकर, नीना मुंबरकर,अन्वय प्रभू, अमेय देसाई, नितीन हडकर, प्रवीण लुडबे, राजा शंकरदास आदी व इतर उपस्थित होते
यावेळी नितीन वाळके, मंदार ओरसकर, सेजल परब, पूनम चव्हाण, मंदार केणी, महेश कांदळगावकर, दिलीप घारे यांनी विचार व्यक्त करत आमदार नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
