Headlines

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना मोफत नृत्य प्रशिक्षण…

नगरसेवक अभिषेक गावडे यांचे सहकार्य:दीक्षा नाईक यांनी दिले मोफत नृत्य प्रशिक्षण..

⚡कुडाळ ता.१८-: शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एकदिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे झालेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध नृत्यांगना दीक्षा नाईक यांनी शहरातील तब्बल ६० विद्यार्थ्यांना मोफत नृत्य प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थ्यांना नृत्याच्या विविध शैलींची ओळख करून देतानाच नृत्यातील मूलभूत तंत्र, कौशल्ये आणि सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शहरातील अनेक मुलांना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार नृत्य प्रशिक्षण घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे नृत्याची आवड असलेल्या मुलांना कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षणाची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा व व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. भविष्यातही कुडाळ शहरातील मुलांच्या कला, क्रीडा आणि शैक्षणिक विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिबिरावेळी व्यासपीठावर नगरसेवक विलास कुडाळकर, रवि कुडाळकर, सुरेश राऊळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे पालक तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page