Headlines

फळ पीक विम्यासाठी १० गुंठ्यांची अट शिथिल करा…

ई-केवायसीची थम अटही रद्द करा:रियाज खान यांची मागणी..

⚡बांदा ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दहा गुंठे क्षेत्राची अट शिथिल करावी, तसेच ई-केवायसीसाठी १५ तारखेपासून लागू केलेली थम (अंगठ्याचा ठसा) देण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी सावंतवाडी तालुका युवासेनेचे अध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायब तहसीलदार श्रीमती गावडे यांना निवेदन सादर केले. यावेळी संजय गावडे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, जमिनींचे लहान तुकडे आणि सामाईक क्षेत्र यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावे दोन ते तीन गुंठ्यांचे स्वतंत्र सातबारा उतारे आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे तीन ते चार वेगवेगळ्या सर्वे नंबरमध्ये मिळून दहा गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असते. मात्र, एकाच सर्वे नंबरमध्ये दहा गुंठे क्षेत्र असण्याची अट असल्याने अनेक पात्र शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दहा गुंठे क्षेत्राची अट शिथिल करून, एकाच लाभार्थ्याच्या नावे असलेल्या वेगवेगळ्या सर्वे नंबरमधील क्षेत्र एकत्रित ग्राह्य धरण्यात यावे. एकूण क्षेत्र दहा गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास संबंधित शेतकऱ्याला विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ई-केवायसी प्रक्रियेसाठी १५ तारखेपासून थम देणे बंधनकारक करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी वयोवृद्ध असून, त्यांना स्वतः सीएससी सेंटरपर्यंत जाऊन थम देणे शक्य होत नाही. शारीरिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना प्रवास करणेही कठीण जाते. त्यामुळे या प्रक्रियेसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फळ पीक विमा योजनेच्या अर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची व प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्यावी. तसेच या अटींमुळे शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करावा, अशी विनंती रियाज खान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page