Headlines

मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत योगेश मुणगेकर प्रथम

नगर वाचन मंदिरतर्फे स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी)

नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत योगेश रवींद्र मुणगेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शुभ्रा शांताराम कांदळगावकर यांनी द्वितीय व आकांक्षा शांताराम कासले यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

ही स्पर्धा ग्रंथालयाच्या वाचन कक्षात पार पडली. व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक विनायक कोळंबकर व दर्श सामंत तसेच ग्रंथपाल संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच श्री देवी सरस्वती आणि संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले.

या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये प्रथम क्रमांक श्रेया शिवाजी गावडे आणि द्वितीय क्रमांक भार्गवी राजन तळासकर यांनी पटकावला. सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना ८ डिसेंबर २०२६ रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे.

सहायक ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांनी आभार मानले. या स्पर्धेला वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर आणि रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page