Headlines

सावंतवाडीतील अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा…

कोलगाव हद्दीतील अनधिकृत गाळे हटविले…

⚡सावंतवाडी ता. २६-: सावंतवाडी शहरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच नगरपरिषद प्रशासनाने आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहराच्या कोलगाव हद्दीतील रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत गाळे हटविण्याची धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

मात्र, ही कारवाई केवळ शहराच्या प्रवेशद्वारापुरती मर्यादित न ठेवता मुख्य बाजारपेठेसह शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिक्रमणांवरही प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील काही व्यावसायिक इमारतींच्या बाहेरील जागा, पदपथ तसेच वाहनतळासाठी राखीव असलेल्या जागांवर अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याने वाहनधारकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही, तर पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शहरातील अनधिकृत स्टॉलधारक, अतिक्रमण करणारे दुकानदार आणि व्यावसायिकांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत स्टॉल हटवून ते जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता कोलगाव हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईमुळे प्रशासन अतिक्रमणांच्या प्रश्नावर गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना मोकळे पदपथ मिळावेत आणि पार्किंगची समस्या दूर व्हावी, यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सर्व भागांत समान पद्धतीने राबविण्याची गरज आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही कारवाई करणार का,..? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page