Headlines

कुडाळ एमआयडीसीत पावसाच्या पाण्यातून औद्योगिक जलसुरक्षेचा प्रयोग…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची संकल्पनेला तत्त्वत मान्यता:व्यवहार्यता अहवालासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश..

⚡कुडाळ :ता.२५-: औद्योगिक वसाहतीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याबरोबरच पावसाच्या पाण्याचे संकलन, साठवण आणि पुनर्वापरातून औद्योगिक जलसुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टीने कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीतील सुमारे ५० एकर क्षेत्रात एकात्मिक जलसंवर्धन व औद्योगिक जलसुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची संकल्पना असोसिएशनने मांडली असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः सकारात्मक मान्यता दिली आहे. तसेच प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कुडाळ दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. औद्योगिक इमारतींच्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित संकलित करून औद्योगिक वसाहतीतील उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या जलसाठ्यांमध्ये साठवायचे आणि आवश्यक प्रक्रिया करून हे पाणी उद्योगांना पुनर्वापरासाठी उपलब्ध करून द्यायचे, अशी या योजनेची संकल्पना आहे.
प्राथमिक प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर स्वच्छता, शीतकरण व्यवस्था, उद्यानांची देखभाल, बांधकाम तसेच उत्पादन प्रक्रियेतील योग्य बिगर-पिण्याच्या कामांसाठी करता येणार आहे. संबंधित उद्योगांच्या गरजेनुसार पाण्याची गुणवत्ता आणि प्रक्रिया पद्धती निश्चित केली जाणार आहे.
सध्या कुडाळ एमआयडीसीला सुमारे पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून पुरवठा केला जातो. यासाठी पंपिंग, वीज, रसायने आणि देखभाल यावर खर्च होतो. मात्र बहुतांश उद्योगांना त्यांच्या विविध कामांसाठी पिण्यायोग्य दर्जाच्या पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवून अन्य औद्योगिक गरजांसाठी पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास एमआयडीसीचा शुद्धीकरण व पाणीपुरवठ्याचा खर्च कमी होण्याबरोबरच उद्योजकांनाही आर्थिक दिलासा मिळू शकतो.
औद्योगिक इमारतींच्या मोठ्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी सध्या नाल्यांमधून वाहून जाते. त्याचे शास्त्रीय पद्धतीने संकलन केल्यास स्थानिक पातळीवर मोठा जलसाठा निर्माण होऊ शकतो. यासाठी छतावरील पाणी संकलन व्यवस्था, गाळणी, साठवण तलाव, पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि वितरण यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. पहिल्या पावसाचे पाणी स्वतंत्रपणे वळविणे आणि भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांचाही या प्रकल्पात समावेश करता येणार आहे.
हवामान बदल, पावसाचे अनियमित वितरण आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रासाठी पर्यायी जलव्यवस्था निर्माण करणे आवश्यक बनले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची वेळ आल्यास औद्योगिक वापरासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर निर्बंध येऊ शकतात. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर उद्योगांचे उत्पादन सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
प्रारंभी ५० एकर क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उद्योगांचे छतांचे क्षेत्रफळ, पाण्याची गरज, उपलब्ध जागा आणि स्थानिक पर्जन्यमान यांचा अभ्यास केला जाणार आहे. प्रकल्पातून किती पाणी संकलित होईल, त्याचा किती पुनर्वापर करता येईल आणि त्यामुळे पाणीपुरवठा व शुद्धीकरण खर्चात किती बचत होईल, याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण कुडाळ एमआयडीसीसह राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींसाठीही तो आदर्श ठरू शकतो.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संकल्पनेची दखल घेत उद्योग संघटनेचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांची समिती स्थापन करून प्रकल्पाच्या तांत्रिक, आर्थिक व व्यावहारिक बाबींचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कुडाळ एमआयडीसीच्या जलसंवर्धनाच्या या अभिनव संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सकारात्मक पाऊल पडले आहे.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, राजन नाईक, ॲड. नकुल पार्सेकर, कुणाल वरसकर, मनोज वालावलकर, उमेश गाळवणकर, अमित वळंजू, किसन बिश्नोई, मनोज जैन, सुमीत दत्त, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, उदय शिरोडकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page