Headlines

सावंतवाडी पंचायत समितीचा कारभार रामभरोसे…

गटविकास अधिकारी निलेश जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गुरुदास गवंडे यांचा गंभीर आरोप:ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर, बायोमेट्रिकचा पत्ता नाही; बांदा मच्छीमार्केटमधील फुटलेल्या फरशांची सहा महिन्यांपासून दुरुस्ती रखडली..

⚡सावंतवाडी ता.२५-:
सावंतवाडी पंचायत समितीच्या कारभारावर स्वराज्य सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, गटविकास अधिकारी निलेश जाधव यांच्या कार्यपद्धतीवर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. पंचायत समितीच्या प्रशासकीय यंत्रणेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याने ग्रामपंचायतींच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची टीका त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामसेवकांना पंचायत समितीत बोलावले!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला संविधानाची फोटो फ्रेम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या फोटो फ्रेम नेमक्या कोणाला देण्यात येणार, असा प्रश्न विचारला असता, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्याने घरकुल बांधलेल्या लाभार्थ्यांना त्या देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा गवंडे यांनी केला आहे. मग इतर नागरिकांचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या फोटो फ्रेम शनिवारी पंचायत समितीत प्राप्त झाल्या. त्यानंतर सोमवारी कार्यालयीन कामकाजाचा दिवस असतानाही त्यांचे वितरण न करता आज ग्रामसेवकांना त्या घेण्यासाठी पंचायत समितीत बोलावण्यात येत असल्याचे गवंडे यांनी म्हटले आहे.

ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; बायोमेट्रिक प्रणाली अद्याप नाही!

ग्रामसेवकांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ वाजताची असताना दुपारी १२ वाजेपर्यंतही काही ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाच्या बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची अंमलबजावणी सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये अद्याप झालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करत गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

बांदा मच्छी मार्केटमधील फुटलेल्या फरशांची सहा महिन्यांपासून दुरुस्ती नाही!

बांदा येथील मच्छी मार्केटमधील फुटलेल्या टाइल्स मे महिन्यापासून आजतागायत त्याच अवस्थेत आहेत. याबाबत पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मे महिन्यात पाहणी करूनही प्रत्यक्ष दुरुस्ती झालेली नाही. वारंवार अंदाजपत्रक तयार असल्याचे आणि लवकरच काम करण्यात येईल, असे सांगितले जाते. मात्र, पाच ते सहा महिने उलटूनही काम होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न गवंडे यांनी उपस्थित केला.

या संदर्भात वारंवार दैनिक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या असून लेखी निवेदनेही देण्यात आली आहेत. तरीदेखील परिस्थितीत बदल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी नेमकी काय?

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून तिचे अधिकार तिला आहेत, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, अशा स्वरूपाचे उत्तर गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याचा आरोप गवंडे यांनी केला आहे. मग पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मार्गदर्शन, नियंत्रण आणि प्रशासकीय समन्वय कोण करणार? वरिष्ठ अधिकारी म्हणून जबाबदारी झटकणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच गटविकास अधिकारी पदावरील नियुक्ती आणि संबंधित अधिकाऱ्याच्या पदश्रेणीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला असून, वर्ग-२ संवर्गातील अधिकाऱ्याला वर्ग-१ पदाचा कार्यभार कोणत्या नियमांनुसार देण्यात आला, याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केली आहे.

पंचायत समितीच्या कारभाराची चौकशी करा!

सावंतवाडी पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज, ग्रामसेवकांची उपस्थिती, बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी, ग्रामपंचायतींच्या प्रलंबित कामांचा आढावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

अन्यथा ग्रामसेवक मार्गदर्शनासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि नागरिक न्यायासाठी पंचायत समितीकडे चकरा मारत राहतील; मात्र प्रत्यक्ष कामे मार्गी लागणार नाहीत. सावंतवाडी पंचायत समितीची अवस्था अशीच राहिली, तर ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण होईल, अशा कठोर शब्दांत त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

You cannot copy content of this page