आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १२ कोटींचा निधी मंजूर; संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती, केसरकर यांचे मानले आभार..

⚡सावंतवाडी, ता. २५-: सावंतवाडी नगरपरिषदेसाठी ९ कोटी रुपये, तर वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी ३ कोटी रुपये असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून, याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांचे आभार मानले.
शासन निर्णय क्रमांक नपावे-२०२६/प्र.क्र.१९८४/भाग-४/नवि-१६ अन्वये सन २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीसाठीच्या लेखाशीर्षांतर्गत सावंतवाडी नगरपरिषद, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यासाठी ९ कोटी रुपये, तर वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी ३ कोटी रुपये असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना संजू परब म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्यामार्फत हा निधी मंजूर झाला आहे. हे सरकार कामाचे श्रेय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना महत्त्व देते. केसरकर यांचे काम वेळोवेळी सुरू असते. या निधीमुळे दोन्ही नगरपरिषदांच्या विकासकामांना चालना मिळणार आहे. यासाठी त्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
