वेंगुर्ला तालुक्यात 8989 महिलांची नोंदणी पूर्ण ; प्रकाश मोहिते यांची माहिती

वेंगुर्ला
शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या पुढाकाराने, वेंगुर्ला नगरपरिषद व अनुलोम संस्थेच्या सहयोगाने आयोजित महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 249 महिलांनी सहभाग घेतला.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, उपकृषी अधिकारी संदीप देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल रगजी, न. प.सभापती गौरी माईणकर,न. प. सभापती गौरी मराठे, नगरसेवक रवींद्र शिरसाट, सचिन शेट्ये
लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दीपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, अनुलोमच्या श्रीहर्षा टेगशे, बाजीराव काळे, प्रथमेश रेडकर, कृषी सखी गार्गी होडावडेकर व मयुरी दाभोलकर
आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी, शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहरी भागातील शेती करणाऱ्या महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, नगरपरिषदेमार्फत या उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्यासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि पात्रतेविषयी सविस्तर माहिती दिली. सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसले तरी प्रत्यक्ष शेतीशी संबंधित असलेल्या महिलांनी या प्रक्रियेची माहिती घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा महाराष्ट्र शासनाने शेती आणि शेती पूरक व्यवसायातील महिलांना अधिकृत” शेतकरी ” म्हणून ओळख देण्यासाठी मंजुर केलेला कायदा आहे..जमिनीची मालकी नसतानाही शेती आणि शेती पूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना या अंतर्गत” महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळून शासकीय योजना, कर्ज व इतर अनुदान याचा लाभ घेता येईल… जेणेकरून महिलांना स्वतःची शेतकरी म्हणून ओळख आणि सन्मान मिळेल..
प्रमाणपत्र प्राप्त महिलांना शासकीय कृषी योजनाचा लाभ, कर्ज सुविधा, कौशल्य विकास व प्रशिक्षण सुविधा, नवीन कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन, स्वतःचा कृषी पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करणारे कार्यक्रम, कृषी शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी इत्यादी लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी शेती आणि शेती पूरक व्यवसायात काम करणाऱ्या सर्व महिलांनी यासाठी नोंदणी करून घेण्यासाठी प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम सुरु असून नोंदणी करून घेण्यात येत आहे.
वेंगुर्ला तालुक्यात आज अखेर पर्यंत 8989 महिलांची नोंदणी झाली असून उर्वरित शेतकरी महिलांनी ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी केले आहे.
शहरी भागात वास्तव्यास असलेल्या; मात्र प्रत्यक्ष शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक महिलांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद झालेली नसते. विशेषतः सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसल्यामुळे अनेक महिलांना शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत संभ्रम असतो. हा गैरसमज दूर करून अधिकाधिक महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, आवश्यक माहिती आणि अर्ज करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सहकार्य करण्यात आले. आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच शेती व शेतीपूरक कामांची माहिती यांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सचिन परुळकर यांनी केले. या उपक्रमाला २४९ महिलांनी दिलेला प्रतिसाद हा महिलांमध्ये शेतकरी प्रमाणपत्राविषयी वाढत असलेल्या जागरूकतेचा प्रत्यय ठरला.
