विशेष कृती आराखड्याची मागणी:विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची घेतली सदिच्छा भेट; आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आग्रही भूमिका..

⚡सावंतवाडी ता २४-: कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि गती देण्यासाठी भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
सावंतवाडी येथे झालेल्या सदिच्छा भेटीदरम्यान विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केवळ सदिच्छा भेटीपुरते मर्यादित न राहता त्यांनी कोकणातील विविध विकासात्मक प्रश्न आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षा नार्वेकर यांच्यासमोर मांडल्या.
आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि कृषी क्षेत्रावर भर
सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण विभागाच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि कृषी या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता असल्याचे विशाल परब यांनी अधोरेखित केले. कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यटन क्षमता, कृषी उत्पादन आणि स्थानिक मनुष्यबळ यांचा योग्य समन्वय साधल्यास रोजगाराच्या तसेच विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निधी, प्रभावी योजना आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नार्वेकरांचा सकारात्मक प्रतिसाद
विशाल परब यांनी मांडलेल्या विकासात्मक मुद्द्यांची ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक दखल घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येतील. कोकणच्या गरजा आणि विकासाच्या संधी लक्षात घेऊन विशेष कृती आराखडा तयार करण्यासाठी तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळकोकणाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे विशाल परब यांनी यावेळी स्पष्ट केले. विकासाच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल त्यांनी ॲड. नार्वेकर यांचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप भालेकर, सोशल मीडिया सेलचे प्रमुख केतन आजगावकर, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, धीरेंद्र म्हापसेकर, प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणच्या विकासाचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या भूमिकेतून विशाल परब यांनी या भेटीद्वारे विकासाभिमुख पुढाकार घेतला आहे. आता या चर्चेतून प्रत्यक्ष विकासकामांना कितपत गती मिळते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
