Headlines

डिझेल परतावा बंद असल्याने ट्रॉलर मच्छिमार अडचणीत

डिझेल धारक मच्छिमारांचे वेगळे वर्गीकरण करण्याची मागणी

मालवण (प्रतिनिधी)

गेले नऊ – दहा महिने डिझेल धारक मच्छिमार नौकांचा शासनाच्या डिझेल अनुदानातून होणारा डिझेल पुरवठा बंद असल्याने ट्रॉलर नौका मालक अडचणीत आले आहेत. शासनाने डिझेल पुरवठ्यामध्ये डिझेल धारक मच्छिमारांचा बल्क वर्गात समावेश केल्याने अनेक अडचणी मच्छिमारांसमोर निर्माण झाल्या असून मच्छिमारी व्यवसाय डबघाईला येण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने डिझेल धारक ट्रॉलर मच्छिमारांसाठी वेगळे वर्गीकरण करून डिझेल परतावा द्यावा, अशी मागणी मालवण मच्छिमार ट्रॉलर मालक संघटनेच्या मच्छिमार प्रतिनिधीनी केली आहे. तसेच या प्रश्नी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालून मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही मच्छिमारांनी केली आहे.

मालवण दांडी येथे मालवण मच्छिमार ट्रॉलर मालक संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मच्छिमार सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी विकी चोपडेकर, संतोष खांदारे, नारायण पटनाईक, आबू आडकर, वासुदेव आजगावकर, बबू वर्देकर, राकेश आडकर, ग्रेसीयस डिसोजा, सेलेस्तीन फर्नांडिस, गणेश गावकर, कांता सावजी आदी उपस्थित होते.

यावेळी विकी चोपडेकर म्हणाले, मालवण बंदरात पूर्वी सुमारे ३५० ट्रॉलर होते. डिझेल नौका धारकांचे बल्क वर्गीकरण केल्याने मच्छिमार संकटात सापडले आहेत. आता मालवण बंदरात ४० डिझेल नौका शिल्लक राहिल्या आहेत. शासनाने डिझेल परतावा बंद केला असून रिटेलर कडून १४८ रु. प्रति लिटर दराने डिझेल घेऊन आम्ही मच्छिमारी करू शकत नाही, ही मच्छिमारी परवडणारी नाही. यामुळे गेले नऊ महिने मच्छिमारांना मोठा त्रास झाला आहे. शासनाकडून डिझेल परतावा न मिळाल्यास अन्यथा आता जे काही मच्छिमार धडपड करून व्यवसाय करत आहेत ते देखील नेस्तनाभूत होतील. डिझेल नौका आणि मच्छिमार संस्था या चालू राहिल्या पाहिजेत. अन्यथा डिझेल नौका धारक मच्छिमार कालबाह्य होतील. मच्छिमार संस्था या केवळ दाखले देण्यापुरत्याच राहतील, अशी भीती विकी चोपडेकर यांनी व्यक्त केली.

या संकटात सरकारने आमच्या पाठीशी राहावे, डिझेल नौका धारक मच्छिमारांसाठी बल्क ऐवजी एक वेगळे वर्गीकरण करून डिझेल पुरवठा करण्यात यावा अशी आमची मागणी असून यासाठी मत्स्योद्योग मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असेही विकी चोपडेकर म्हणाले..

यावेळी संतोष खांदारे म्हणाले, डिझेल पुरवठ्यातील बल्क वर्गीकरणामुळे मार्च २०२६ पासून मच्छिमार संस्थांकडून डिझेल उचल झालेली नाही. रिटेलर विक्रेत्याकडून डिझेल घेणे संस्थांना शक्य नाही. यामुळे संस्था बंद पाडण्याच्या स्थितीत आहेत. राज्य सरकार डिझेल परतावा देत होते, त्याच प्रमाणे सरकारने परतावा द्यावा, परतावा चालू ठेवण्याचा विचार करावा. आमची ही मागणी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येऊन आम्हाला न्याय मिळावा, असेही श्री. खांदारे म्हणाले.

You cannot copy content of this page