Headlines

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नूतन शव-कूलिंग पेटीचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील मशिनरी सतत नादुरुस्त होत असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेऊन रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी व विद्यमान नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी यांनी हा विषय समितीच्या बैठकीत उचलून धरला होता.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जमा झालेल्या निधीतून नूतन शव-कूलिंग पेटी मंजूर करून घेण्यात आली. यासाठी स्थानिक आमदार श्री. दीपक भाई केसरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक हृदयरोग तज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांनी सहकार्य केले. त्यामुळे सावंतवाडीतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

आज उद्घाटन संपन्न

सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या नूतन शव-कूलिंग पेटीचे उद्घाटन करण्यात आले. निधन झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक दूरच्या गावातून येत असतात. त्यावेळी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी ही पेटी अत्यंत आवश्यक असते.

या उद्घाटनाचा शुभारंभ रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी श्री. देव्या सूर्याजी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र (राजू) मसुरकर, आनंदराव गायकवाड,वैद्यकीय अधिकारी रुपाली हेळेकर,परिचारीका वैष्णवी गोसावी,सुप्रिया नाईक,मानसी गावडे,श्रीकृष्ण सावंत,नमिता इंगळे,महेश बावकर,वामन पालव उपस्थित होते. तसेच रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

नातेवाईकांना दिलासा

यापूर्वी शवगृह वारंवार नादुरुस्त होत असल्याने नातेवाईकांना मृतदेह ठेवण्यासाठी अडचण येत होती. आता नूतन कूलिंग शवपेटी उपलब्ध झाल्याने ही समस्या दूर झाली असून रुग्णालय प्रशासन व रुग्ण कल्याण नियामक समितीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page