मालवण (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मालवण शहरात गवंडीवाडा येथे सोमवारी चावडी बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणुकीत मत चोरी कशी झाली याबाबत काँग्रेस नेते व विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे पत्रक नागरिकांना वाटप केले.
प्रदेश काँग्रेस कामटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि काँग्रेसचे लोकसभा प्रभारी शशांक बावचकर, जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे, कुडाळ विधानसभा प्रभारी गौस खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत मालवण गवंडीवाडा येथे चौपाल – चावडी बैठक घेण्यात आली. यावेळी सोमवार आठवडा बाजार असल्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसोबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना संवाद साधता आला. निवडणूक मतमोजणी दरम्यान मत चोरी कशी आणि कधी झाली याबाबत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे पत्रक वाटण्यात आली. गवंडीवाडा परिसर तसेच सोमवार बाजारपेठ याठिकाणी पत्रक वाटप करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस डॉ.विवेक रायकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, तालुका सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, युवक काँग्रेस जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
