सभागृहाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास आयुक्तांकडे तक्रार करणार; अध्यक्ष प्रमोद कामत यांचे यापुढे शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे स्पष्ट आदेश..

⚡ओरोस, ता. २३-: आंतरजिल्हा बदली तसेच राजीनामा दिलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी चांगलाच वाद रंगला. सभागृहाला विश्वासात न घेता आठ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याची माहिती समोर आल्यानंतर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे एकाही शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्हा परिषदेच्या २८ कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या प्रश्नावरही त्यांनी ठाम भूमिका घेतली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने यांनी आठ ते दहा शिक्षकांना कार्यमुक्त केल्याचे सांगितल्यानंतर अध्यक्षांनी याबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभागृहाला माहिती का दिली नाही, असा सवाल केला. राजीनामा दिलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सदस्य संदेश सावंत यांनी संबंधित शिक्षक तुमचे पाहुणे लागतात का, असा थेट सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले.
राजीनामा नामंजूर करता येतो का, तसेच शिक्षकांच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होणारा अन्याय वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याची भूमिका सदस्यांनी मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीला अनुपस्थित असल्याने काही विषयांवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले. यापुढे एकाही शिक्षकाला सोडू नये. जो राजीनामा देऊन जातो, त्याला जाऊ द्यावे; मात्र बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा परिषदेच्या २८ कर्मचाऱ्यांनाही कार्यमुक्त करू नये, असे स्पष्ट निर्देश अध्यक्ष कामत यांनी दिले. सभागृहाला डावलून कोणताही निर्णय घेतल्यास आयुक्तांकडे तक्रार केली जाईल, असा इशारा संदीप गावडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी माने यांना दिला.
शिक्षकांना प्रशिक्षणाच्या नावाखाली सतत गुंतवून न ठेवता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना सुमेधा पाताडे यांनी केली. पवित्र पोर्टलवर एकाच उमेदवाराकडून चार ठिकाणी अर्ज दाखल केले जात असल्याने स्थानिक उमेदवारांवर अन्याय होतो आणि त्यातून उमेदवारांमध्ये वाद निर्माण होतात, असा मुद्दा संदेश सावंत आणि रूपेश कानडे यांनी उपस्थित केला. यावर सभागृहाचा ठराव घेण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलची शालेय वाट बंद करता येते का, तसेच या वाटेवर लावण्यात आलेल्या मोठ्या झाडांबाबतही चर्चा झाली. हळदीचे नेरूर येथील मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता बंद असल्याचा मुद्दा रूपेश कानडे यांनी उपस्थित केला. याबाबत वारंवार मागणी करूनही माहिती मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील सभेत हा विषय पुन्हा उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्या नादुरुस्त सायकलींचे निर्लेखन करून त्या पुरवठादाराकडूनच दुरुस्त करून घ्याव्यात. यासाठी ग्रामपंचायतीचा एकही पैसा खर्च होऊ नये, अशी सूचना संदीप गावडे यांनी केली. महामार्ग विभागाचे अधिकारी सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल रूपेश कानडे यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. तीन अपत्ये असलेल्या लाभार्थ्यांना स्वनिधी योजनेत लागू असलेली अट रद्द करण्याची मागणी सुमेधा पाताडे यांनी केली. त्याप्रमाणे ठराव घेण्यात आला.
