वडिलांच्या खुनाप्रकरणी दोघे मुलगे अटकेत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी..
⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील जंगलमय परिसरात मिळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करुन आरोपींना शिताफीने ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .
वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद असलेला मयत अनोळखी इसम मृत व संशयास्पद स्थितीत दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मिळून आला होता. सदरचे प्रेत अनोळखी इसमाचे व संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने त्याबाबत तपास करण्यारीता जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर, व अपर पोलीस अधीक्षक, कु. नयोमी साटम यांनी आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे, वेंगुर्ला पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके तयार करुन तपास सुरू करण्यात आला होता.
वरिष्ठाचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांचे नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करुन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मानवी कौशल्य, स्थानिक पातळीवरील चौकशी असा चौफेर तपास सुरु करण्यात आला. अविरतपणे तपास सुरू असताना आकस्मित मृत्यूचे तपासाअंती वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे दहा दिवसात दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे तपासाची चक्रे अधिक तीव्र करुन सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण, रेल्वे कडून मिळविलेली माहीती आणि स्थानिक पातळीवर मानवी कौशल्याने तपास करुन सदर मयत इसम हा दाऊद शेख, रा.बिहार असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर मयताच्या मोबाईल नंबरच्या तांत्रीक विश्लेषणावरुन त्याच्या हालचाली व त्याचे नातेवाईकांची माहीती घेवून सवशयित आरोपी नजरे दाऊद आलम, वय 31 वर्षे, व त्याचा लहान भाऊ एक विधीसंघर्षग्रस्त बालक दोन्ही मुळ राहणार वृन्दावन टोला, नरदरवा, सितालपूर, पुर्वी चम्पारण राज्य-बिहार, सध्या रा. आरोंदा, रेडकरवाडी, ता. सावंतवाडी यांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न करुन त्यांना आरोंदा येथून दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साफळा रचुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्ह्यातील मयत हे आपले वडील असून त्यांचे नाव दाऊद मुसाफीर शेख, वय ५६ वर्षे, रा. वृन्दावन टोला, नरदरवा, सितालपूर, पुर्वी चम्पारण राज्य-बिहार असे असल्याचे सांगितले. वडील हे सतत कुटुंबाला दारु पिऊन त्रास देणे, मारझोड करीत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण दोघांनीही मिळून संगनमत करुन वडीलांना ठार मारुन त्याचे प्रेत लपविण्याचे उद्देशाने रेडी येथील जंगलमय भागात नेवून टाकल्याचे कबुल केले आहे. संबंधित दोन्ही आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्याना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आलेली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. मोहन दहिकर, अप्परपोलीस अधीक्षक, कु. नयोमी साटम यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक- सुनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक- अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुधिर सावंत, पोलीस अंमलदार- राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, सुरेश राठोड, प्रकाश कदम, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालविस, अविनाश ओटवणेकर, अमर कांडर, महेश्वर समजिसकर, सायबर पोलीस ठाणेचे – फ्रिडम बुथेलो व धनश्री परब, एटीबी चे पोलीस अंमलदार योगेश साटम, सावंतवाडी येथील पोलीस अंमलदार सिध्दार्थ प्रभूतेंडोलकर, अंमलदार ऋषीकेश टोपले यांनी केलेली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर यांनी दिली . तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले .

