मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी; विठ्ठलवाडी ग्रामस्थ आक्रमक, २५ नोव्हेंबरला जाहीर बैठकीचे आयोजन…

⚡देवगड ता.२३-:
देवगड शहरातून मासळीची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर सांडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सांडलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. या गंभीर समस्येकडे देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी आज पुन्हा देवगड तहसीलदार , देवगड पोलीस स्टेशन, देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी, मत्स्य विभाग कार्यालय देवगड यांना याबाबत निवेदन दिले आहे.
यापूर्वीही विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपंचायतीकडे निवेदन दिले होते. मात्र, त्यावेळी करण्यात आलेल्या उपाययोजना तात्पुरत्या मलमपट्टीप्रमाणे ठरल्या आहेत. अपेक्षित सुधारणा होण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात रस्त्यावर मासळीचे दुर्गंधीयुक्त पाणी सांडत आहे त्याचबरोबर मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची दादागिरीही वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी आज देवगड तहसीलदार, देवगड पोलीस स्टेशन, मत्स्य परवाना अधिकारी, नगरपंचायत यांना दिले आहे. यावेळी
विजय शिरसाठ ,विनायक गिरकर, अमोल सावंत,अनिल कोरगावकर, अवी खडपकर, विजय पाटकर,संतोष पाटणकर,सोहम पारकर, महेंद्र पारकर, मिहीर खडपकर, आनंद कुलकर्णी, जितेंद्र गिरकर,नीरज पोकळे, चिन्मय खानविलकर, स्वप्निल पाटकर, शिवदास पाटकर, समीर खडपे, उत्तम पोकळे,गौरव खानविलकर, सिद्धेश कावले, गौरव कावले आदी उपस्थित होते
