Headlines

फोंडाघाटात महामार्गाच्या कामावरील लाखो रुपयांच्या मशिनरीचे पार्ट चोरीला!

५ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास; कामगार निघून गेल्यानंतर चोरट्यांचा डल्ला

टीसीएम, एसपी ६४ आणि डीबीआय मशिनरीचे महत्त्वाचे पार्ट, केबल व वायरिंग कापून नेले; कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कणकवली : देवगड -निपाणी राज्य महामार्ग क्रमांक १७८ च्या रुंदीकरणाच्या कामासाठी फोंडाघाट येथील गांगोवाडी परिसरात आणून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या मशिनरीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पीक्यूसी पेव्हर मशिनसोबत असलेल्या टीसीएम, एसपी ६४ आणि डीबीआय या मशिनमधील महत्त्वाचे पार्ट, इलेक्ट्रिक वायरिंग, केबल तसेच अन्य साहित्य चोरट्यांनी कापून व तोडून नेले. या चोरीत तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निखील कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर प्रसाद श्रीकांत शेळके (वय ३५, सध्या रा. शिवाजीनगर, नांदगाव, ता. कणकवली) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रसाद शेळके हे गेल्या १३ वर्षांपासून संबंधित कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असून, कंपनीच्या विविध ठिकाणच्या कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सन २०२५ पासून कंपनीला देवगड-निपाणी राज्य महामार्ग क्रमांक १७८ च्या रुंदीकरणाचे काम मिळाले आहे. त्याअंतर्गत फोंडा बाजारपेठ ते फोंडाघाट या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

या कामासाठी पीक्यूसी पेव्हर मशिनचा वापर करण्यात येणार होता. त्यासाठी दोन मशिन कामाच्या ठिकाणी आणण्याचे नियोजन कंपनीने केले होते. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथून पीक्यूसी पेव्हर मशिन व त्याचे सर्व पार्ट चार वाहनांमधून फोंड्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. यामध्ये एमएच ४६ डीसी २२१२, एमएच ०४ एचवाय २१४१, एमएच ४६ डीसी ६६१२ क्रमांकाचे तीन ट्रेलर आणि एमएच १२ एसएक्स ३७६६ क्रमांकाच्या एका ट्रकचा समावेश होता. ही वाहने २१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास फोंडा गांगोवाडी येथे पोहोचली. त्यानंतर रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत पीक्यूसी पेव्हर मशिन व त्याचे सर्व पार्ट उतरवून ठेवण्यात आले. साहित्य उतरविल्यानंतर तीन ट्रेलर आणि एक ट्रक पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

मशिनरी उतरविण्यात आलेल्या ठिकाणी तिची जोडणी आणि इतर आवश्यक कामे करण्यासाठी कामगार नेमण्यात आले होते. हे कामगार रात्री आठ वाजेपर्यंत कामाच्या ठिकाणी होते. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दरम्यान, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली दुसरी पीक्यूसी मशिन देवगड येथे असल्याने ती आणण्यासाठी प्रसाद शेळके हे अन्य कामगारांसह २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास देवगडच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे गांगोवाडी येथे ठेवलेल्या मशिनरीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणीही कामगार उपस्थित नव्हते.

दरम्यान, प्रसाद शेळके हे दुसरी पीक्यूसी मशिन घेऊन २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास देवगड येथून फोंड्याच्या दिशेने निघाले. २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ते फोंडा गांगोवाडी येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी तेथे ठेवलेल्या मशिनरीची पाहणी केली असता अनेक महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. टीसीएम, एसपी ६४ आणि डीबीआय या तीन मशिनमधील महत्त्वाचे पार्ट तसेच त्यांना जोडलेले वायरिंग व केबल तोडून काढण्यात आले होते. मशिनमधील डिझेल आणि तांब्याचे कोटिंग केलेल्या वायरीही कापून नेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या चोरीमध्ये टीसीएम मशिनमधील रेलिंग (१ लाख रुपये), एसपी ६४ मशिनमधील व्हायब्रेटर मोटार सेट व केबल (२ लाख ८० हजार रुपये), एसपी ६४ मशिनमधील सेन्सर लॉक आर्म (४० हजार रुपये), एसपी ६४ मशिनमधील साईट प्लेट सेट (४० हजार रुपये), तसेच डीबीआय मशिनमधील इलेक्ट्रिक स्विच, व्हायब्रेटर केबल, पॅनेल बोर्ड व कॉस्मेटिक पॅनेल (७० हजार रुपये) असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चोरट्यांनी केवळ सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू न चोरता मशिनरी सुरू करण्यासाठी आणि रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पार्टवरच डल्ला मारल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. हे पार्ट काढण्यासाठी मशिनरीचे वायरिंग आणि केबलही कापण्यात आल्याने अतिरिक्त नुकसान झाले आहे.

२१ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता कामगार काम संपवून निघून गेल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता प्रसाद शेळके परत येईपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा संशय आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची बिले तसेच आणखी कोणते साहित्य चोरीला गेले आहे का, याची खात्री करून त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आणि साहित्याची नावे पुढील तपासात पोलिसांना सादर करण्यात येणार असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासारख्या महत्त्वपूर्ण कामासाठी आणून ठेवलेल्या मशिनरीमधील लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या महागड्या मशिनरी आणि साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. भरवस्तीजवळील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतून एवढ्या मोठ्या किमतीचे साहित्य चोरून नेण्यात आल्याने चोरट्यांनी नेमकी कोणती पद्धत वापरली, साहित्य वाहून नेण्यासाठी वाहनाचा वापर केला का आणि चोरीचा मुद्देमाल कुठे नेला, याचा शोध घेण्याचे आव्हान कणकवली पोलिसांसमोर आहे.

You cannot copy content of this page