तथाकथित पर्यावरणवाद्यांनी आधी पर्यावरण संवर्धनासाठी केलेले काम सांगावे; नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांचा जयेंद्र परुळेकर यांना सवाल..

⚡सावंतवाडी ता.२३-: ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवण्याच्या निर्णयाला विरोध करणारे जयेंद्र परुळेकर यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार..? असा संतप्त सवाल निरवडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांनी केला आहे. तथाकथित पर्यावरणवाद्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आतापर्यंत नेमके काय केले, याचा खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यांत ओंकार हत्तीने अनेक वाहनांचे, तसेच भातशेती, नारळ आणि केळीच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या वेदना आणि अश्रू पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्यांना कसे समजणार? असा सवाल पै यांनी उपस्थित केला.
पर्यावरणाच्या नावाखाली काही जण स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचा आरोप करत, ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवण्यास जयेंद्र परुळेकर यांचा नेमका विरोध कशासाठी आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे पै म्हणाले. त्यांच्या भूमिकेत दुटप्पीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.
जर संबंधित पर्यावरणवादी स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास तयार असतील, तर त्यांनी विरोध करण्यास हरकत नाही. मात्र, केवळ राजकीय स्वार्थातून सत्ताधाऱ्यांवर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करण्यासाठी विरोध केला जात असेल, तर ते योग्य नाही. पालकमंत्र्यांनी वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे, असेही पै यांनी नमूद केले.ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवा किंवा त्याला पुन्हा हत्तींच्या कळपात सोडा; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याच्या उपद्रवामुळे सहन करावा लागणारा त्रास कायमचा दूर करा, असे भावनिक आवाहन नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांनी केले आहे.
