Headlines

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन डॉ. रुपेश कुमार झा रुजू…

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेचे विशेष कौशल्य; नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन तथा पोटविकार तज्ज्ञ म्हणून डॉ. रुपेश कुमार झा सोमवारी रुजू झाले. त्यांच्या नियुक्तीमुळे उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया सुविधांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी तथा विद्यमान नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. झा यांचे स्वागत केले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, माजी सैनिक अधिकारी दीपक शिर्के, रुग्णालयाच्या अधिकारी रूपाली हेळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. रुपेश कुमार झा हे मूळचे बिहार राज्यातील असून त्यांचे कुटुंब सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. त्यांनी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातून एमबीबीएस, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई (जि. बीड) येथून एम.एस. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी लातूर जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बजावली असून आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ते रुग्णसेवा देणार आहेत.
डॉ. झा यांचे विशेष कौशल्य लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमध्ये असून अपेंडिक्स, हर्निया यांसारख्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया ते या आधुनिक पद्धतीने करतात. त्यामुळे सावंतवाडी परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिक चांगल्या शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी व डॉ. रुपेश कुमार झा यांना दिले.

You cannot copy content of this page