Headlines

आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घ्या…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे निवेदन..

⚡दोडामार्ग ता.२२-: आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय प्रक्रिया, ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धतींची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आडाळीचे सरपंच पराग गावकर, प्रशांत जाधव व बाबा धुरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. गेल्या वर्षभरापासून रखडलेले भूखंड वाटप आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया अलीकडच्या काळात पूर्णत्वास गेल्याने ६० हून अधिक उद्योजकांनी प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या दिशेने पावले टाकली आहेत.
मात्र, या औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भूखंडधारक हे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महामंडळाच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रक्रियांची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने उद्योजकांचा वेळ खर्च होत असून, प्रत्यक्ष उद्योग उभारणीला विलंब होत आहे.
या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, परवानग्या, ऑनलाइन अर्ज आणि इतर बाबींचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच उद्योग उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळून औद्योगिक क्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडाळी आणि आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page