कालव्याची सुरक्षितता जपत सफाई करा; मनुष्यबळ वाढविण्याची जावेद खतीब व बाळू सावंत यांची मागणी..

⚡बांदा ता.२३-: तिलारीच्या बांदा शाखा कालव्याच्या साफसफाईच्या कामाला आजपासून नेतर्डे खोलबागवाडी येथून प्रारंभ करण्यात आला. मशीनच्या साहाय्याने कालव्यातील झुडपांची तोड करून सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब व राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी कालव्याची तातडीने साफसफाई करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या निवेदनाची दखल घेत कालवा विभागाने काम सुरू केले आहे.
कामाच्या प्रारंभी जावेद खतीब व बाळू सावंत यांनी नेतर्डे येथे प्रत्यक्ष भेट देऊन सफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार व कालवा विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांच्याशी चर्चा केली. कालव्याची सुरक्षितता जपत साफसफाई करावी, तसेच कालव्याच्या बांधकामाला कुठेही इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कालव्याची लांबी अधिक असून पाणी सोडण्यासाठी वेळ कमी असल्याने साफसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून सफाईला वेग द्यावा, अशी मागणी खतीब व सावंत यांनी यावेळी केली.
बांदा शाखा कालव्याच्या साफसफाईला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकरी व बागायतदारांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कालव्यातील झुडपे, गवत व गाळामुळे पाणी वाहून नेण्यास अडथळे निर्माण होत असल्याने सफाईचे काम वेळेत पूर्ण करून कालव्यातून पाणी सोडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी खतीब व सावंत यांनी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
