तहसीलदार सचिन पाटील:४९ लाभार्थ्यांनी घेतला लाभ..

⚡कुडाळ ता.२३-: शासकीय योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे विविध दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मुळदे ग्रामपंचायतीचा उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याचा त्रास वाचवून गावपातळीवरच जलदगतीने दाखले उपलब्ध करून देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले. मुळदे येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत शिबिरात एकूण ४९ लाभार्थ्यांनी विविध सेवांचा लाभ घेतला.
ग्रामपंचायत मुळदे आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, तहसीलदार कार्यालय कुडाळ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, सरपंच संध्या मुळदेकर, उपसरपंच प्रवीण पालव, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय पालव, ग्राममहसूल अधिकारी विद्या अरदकर, पोलीस पाटील रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा पालव, वैशाली पालव, ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरसकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, सीआरपी मंगल म्हापणकर, ग्रामस्थ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की, मुळदे ग्रामपंचायतीकडून दरवर्षी महाराजस्व अभियान राबविले जाते. गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि आवश्यक दाखले एकाच छताखाली मिळावेत, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. शेतकऱ्यांनीही शासनाच्या विविध योजनांसह शेतीशी संबंधित लाभांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनीही शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेली माहिती व मार्गदर्शनाची सुविधा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात जात, उत्पन्न, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व, भूमिहीन शेतमजूर, ईडब्ल्यूएस, वारस, रहिवासी, शेतकरी, डोंगरी, प्रकल्पग्रस्त, अल्पभूधारक तसेच नॉन क्रिमिलेयर दाखल्यांसह विविध प्रमाणपत्रांसाठी मार्गदर्शन व अर्जप्रक्रिया करण्यात आली. तसेच रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे, नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजनेसाठीची कागदपत्रे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि महिलांसाठी आवश्यक दाखल्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा एकूण ४९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील रामदास चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरसकर यांनी आभार मानले.
