Headlines

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी उपाययोजनांना गती द्या…

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; ३७२ बंधारा दुरुस्ती कामे मंजूर, स्वच्छता अभियानातील अपूर्ण कामांवर सदस्यांची नाराजी..

⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून जिल्ह्यातील पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व तलावातील गाळ तसेच बंधाऱ्यांची गळती काढणे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेकडील सर्व मंजूर कामे ३१ मार्च पूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करा. अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत केली.

जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीची सभा अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह सदस्य मनोज राव राणे, सुप्रिया वालावलकर, वर्षा सांबारी, आरती पाटील आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस आढावा घेताना जिल्ह्यातील दुष्काळ जन्यस्थितीमुळे उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती मधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी बंधाऱ्यांचे कार्यारंभ आदेश तात्काळ निर्गमित करून सदर कामे वेळीच पूर्ण करण्यात यावीत. अश्या सूचना सदस्यांनी केल्या. यावेळी माहिती देताना लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडील दुष्काळ नियोजन अंतर्गत एकूण ३७२ बंधारा दुरुस्ती कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून त्यापैकी अद्यापपर्यंत २३ कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत तर उर्वरित कामांची निविदा कार्यवाही सुरू असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागांतर्गत पाणीसाठा होणाऱ्या एकूण दहा लघुपाटबंधारे योजना आहेत. त्यामधील पाणीसाठ्याचा विचार करता भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलाशयातील शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असून त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे चालू असल्याने सद्यस्थितीत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नाही अशी माहिती देण्यात आली.

स्वच्छता भारत मिशन अंतर्गत कामाचा आढावा घेताना जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय १६१८ उद्दिष्ट पैकी १००६ शौचालय पूर्ण झाले असून ६२.६० टक्के काम पूर्ण झाले आहे तर सार्वजनिक शौचालयाचे उद्दिष्ट ८३ एवढे असून त्यापैकी २१ शौचालयांची बांधकाम पूर्ण झाले असून ६९ कामाना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा वर्गीकरण शेड व इतर कामे मिळून मंजूर १६० कामापैकी केवळ १७ कामे पूर्ण झाली असून अद्यापही १४३ कामे अपूर्ण असल्याचे सभेत उघड झाले आतापर्यंत केवळ १०.६३ टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती सभेत उघड झाली यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत ही कामे तातडीने पूर्ण करा. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात येईल. असे स्पष्ट केले.

मैंला गाळ व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात १३ कामे मंजूर असून १० कामांचे प्रस्ताव प्राप्त आहेत त्यापैकी ८ कमाना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र एकही कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याबाबत सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला असता काही कामांना अद्याप जागा उपलब्ध नाही, तर शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सभेत दीली.

३१ पाणी नमुने दूषित

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या ५५० पाणी नमुन्यापैकी ३१ पाणी नमुने दूषित आले असून दूषित पाण्याची टक्केवारी ५.६४ एवढी आहे अशी माहिती यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली, यावर चर्चा करताना ज्या भागात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे, वारंवार पाणी नमुने दूषित येत आहेत असे पाण्याचे स्त्रोत तातडीने शुद्धीकरण करा तसेच पाणी दूषित होण्यामागची कारणे शोधून त्यावर तात्काळ उपायोजना करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी सदस्यांनी केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नळपाणीयोजना दुरुस्ती, विंधन विहिरी यासह विहिरींचे , तलावाचे गाळ काढणे तसेच बंधारे दुरुस्तीची कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत. यासाठी पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि लघुपाटबंधारे या विभागांनी समन्वयाने काम करावे. त्यामध्ये हायगय केलेली चालणार नाही. अशा सक्त सूचना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

You cannot copy content of this page