Headlines

संत तुकारामांच्या अभंगपरंपरेला वंदन; सेवांगणतर्फे वाचनसंस्कृतीचा जागर

मालवण : (प्रतिनिधी)

संतवाङ्मयाची समृद्ध परंपरा, लोकभाषेतील अभिव्यक्तीचे सामर्थ्य आणि वाचनसंस्कृतीचा जागर या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मालवण येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिरात पादुका पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. संतपरंपरेला वंदन करतानाच पुस्तकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृती समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी वैशाली पंडित यांनी मालवणमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यामागील भूमिका विशद केली. संत तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे संत नसून समस्त कवी, लेखक आणि साहित्यिकांचे प्रेरणास्थान व गुरू आहेत. त्यांनी आपले अभंग सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले आणि ते घराघरांत पोहोचविले. अवघड तत्त्वज्ञान साध्या, सहज आणि ओघवत्या लोकभाषेतून मांडण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. त्यामुळे त्यांचे अभंग हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता लोकांच्या जगण्याचा, विचारांचा आणि भावविश्वाचा भाग बनले, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी पुस्तकांचे संच भेट देणे. बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते सेवांगणच्या वतीने वाचनासाठी पुस्तकांचे संच मंदिरात प्रदान करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या वतीने श्री. दशरथ कवटकर यांनी हे पुस्तकसंच स्वीकारले. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनीही आपली पुस्तके स्थानिक नागरिकांना वाचनासाठी भेट दिली. सौ. कवटकर यांनी ती स्वीकारली. अशा प्रकारे संतांच्या पवित्र स्थानावर अभिवादनासोबतच ज्ञानदान आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी दशरथ कवटकर यांनी संत तुकाराम महाराज पादुका मंदिराची माहिती थोडक्यात सांगितली. ॲड. देवदत्त परुळेकर यांनी आपल्या मनोगतात वैशाली पंडित यांनी मांडलेल्या या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा आशीर्वाद घेणे आणि त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, हा उपक्रम साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकाराम महाराजांचे साहित्यिक म्हणून असलेले महत्त्व विशद करत त्यांनी संतसाहित्याने मराठी भाषेला आणि साहित्यविश्वाला दिलेल्या समृद्ध योगदानाचा उल्लेख केला. तसेच २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

या कार्यक्रमाला मंगल परुळेकर, दशरथ कवटकर, अशोक ओटवणेकर, अभय कवटकर, प्रणाली कवटकर,श्वेता कवटकर, अनिता चव्हाण, ऋतुजा केळकर, गौरी केळुस्कर यांच्यासह देऊळवाडा परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले, तर डॉ. ज्योती तोरसकर यांनी आभारप्रदर्शन केले.

You cannot copy content of this page