Headlines

२६/११ च्या शहीदांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत मानवंदना…

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रम:आजचा युवक आणि त्याच्यासमोरील आव्हाने’ विषयावर प्रकट मुलाखत..

⚡कुडाळ ता.२४-: मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात मानवंदना देण्यात येणार आहे.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या शहीद स्तंभाजवळ दरवर्षी पुष्पचक्र अर्पण करून या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात येते. यंदाही बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस ठाणे आणि कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे. यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर आणि कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे उपस्थित राहणार आहेत.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शासनाच्या निर्देशानुसार संविधान दिनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, याच कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनिक तरुण भारत आणि साई जळवी फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजचा युवक आणि त्याच्यासमोरील आव्हाने’ या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला तसेच प्रकट मुलाखतीला देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page