Headlines

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक उघड…

३८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त:
बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..

⚡बांदा ता.२५-: गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा येथे धडक कारवाई केली.

या कारवाईत विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या १० हजार ५० बाटल्या असलेले २४० कागदी बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी असा एकूण ३८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक प्रमोद अशोक निर्मळ (वय २७, रा. निर्मळ मळा, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता नरवणे आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील बांदा सर्व्हिस रोडवर सलगर चहा दुकानासमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी गोव्याच्या दिशेने बांद्याकडे येणाऱ्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या MH-09-GJ-8235 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील हौद्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या एकूण २४० कागदी बॉक्समध्ये भरलेल्या १० हजार ५० बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणात अंदाजे २८ लाख ८० हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि १० लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ३८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, जवान दीपक वायंगडे, संदीप कदम, वाहनचालक नितीन, सागर सूर्यवंशी, सतीश चोगुले आणि अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

You cannot copy content of this page