अन्यथा आठ दिवसांत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालणार; संजू परब यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी शहराच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून, सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शहरातील नळपाणी योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अन्यथा आठ दिवसांत मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी संजू परब म्हणाले की, नागरिकांना पाण्याची गरज असताना सत्ताधारी गटातील काही लोकांकडून नळपाणी योजनेचे काम थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. शहरातील नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.
गेल्या सात महिन्यांपासून काम बंद असताना प्रशासनाकडून ते सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून काम सुरू करावे. अन्यथा आठ दिवसांची मुदत संपल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संजू परब यांनी दिला.
