सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी पुढील तीन वर्षांसाठी निवड

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी दयानंद चौधरी यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड जाहीर झाली असून, त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या सोडविणे, तसेच ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद कार्यरत आहे. या परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील इच्छुकांनी अर्ज केले होते. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.
दयानंद चौधरी हे १९९९ पासून ‘प्रगत सिंधुदुर्ग मुंबई’ आणि ‘श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट’ या नोंदणीकृत सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून ते जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासोबतच ग्राहक हक्कांविषयी जनजागृतीचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची सलग तिसऱ्यांदा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
