जयेंद्र रावराणे:वैभववाडीत संविधान दिन उत्साहात…
वैभववाडी प्रतिनिधी
लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे. संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूलभूत तत्त्वांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, माता रमाई महिला मंडळ आणि अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव होते.
यावेळी बौद्ध सेवा संघाचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रवींद्र पवार, शरद कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक शरद नारकर, बाबुराव रावराणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर नादकर, मुंबई शाखेचे सहसचिव प्रभाकर कांबळे, सुप्रिया कांबळे, श्रीपत कुसुरकर, भगवान जाधव, उदय जाधव, मंगेश कांबळे, अर्जुन कदम, अजित कदम, प्रमोद जाधव, रुपेश कांबळे यांच्यासह बौद्ध सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधानाच्या प्रास्ताविकेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचे आचरण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
चौकट : २६/११ च्या शहीद जवानांना श्रद्धांजली
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले.

