Headlines

पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे जनतेची फसवणूक…

परशुराम उपरकर:टोलमाफीच्या घोषणेवर उपरकरांचा सवाल; महामार्ग, विमानतळ, आरोग्य व्यवस्थेवरही सरकारला घेरले..

⚡कणकवली ता.१८-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या विविध घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे केवळ एप्रिल फूल ठरत आहेत, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना एमएच-०७ वाहनांना टोलमाफीची भेट दिल्याची घोषणा केली. मात्र टोलमाफीच्या जाहिरातीमध्ये एमएच-०७ वाहनांना कोणतीही स्पष्ट सूट नमूद नसल्याचा दावा उपरकर यांनी केला. टोलमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर ही जनतेची आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनांची दिशाभूल आहे, असे ते म्हणाले.

टोलमाफीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्यास आपण त्यांच्यासोबत राहू आणि आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपरकर यांनी दिला. टोलच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांच्या भूमिकेबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केले.

विमानतळाच्या प्रश्नावरही उपरकर यांनी पालकमंत्र्यांच्या घोषणांवर टीका केली. १५ ऑगस्टला विमानतळावर विमान उतरविण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र त्याची पूर्तता झाली नाही, असा दावा त्यांनी केला. घोषणा मोठ्या होतात; मात्र प्रत्यक्षात त्या पूर्ण होत नसतील तर जनतेच्या पदरी निराशाच येते, असे ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरूनही उपरकर यांनी सरकारला धारेवर धरले. महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या वारंवार घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अद्याप खड्डेमय असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही खराब रस्त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांसाठी प्रवासाची योग्य व्यवस्था करण्याची गरज असताना खासगी बस चालकांकडून मोठ्या प्रमाणावर भाडे आकारले जाते. या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पालकमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये आरोग्य यंत्रणेची स्थिती ढासळलेली असून, त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे आता नव्या घोषणांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही उपरकर यांनी केली.

दरम्यान, विकासकामांच्या दर्जाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत कामांमध्ये कथित टक्केवारीच्या व्यवहारामुळे कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. रस्त्यांची झालेली दुरवस्था हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या आरोपांबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page