कोकण विभागीय कार्यालय व इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन:सहा नवउद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण..
⚡कुडाळ ता.१८-: गावागावातील स्थानिक साधनसंपत्ती, कौशल्य आणि उपलब्ध मनुष्यबळाला उद्योगाची दिशा देत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची महाराष्ट्रातील दमदार सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झाली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे तसेच ‘गाव तिथे उद्योजक’ इन्क्युबेशन कौन्सिल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
विशेष म्हणजे, कोकण विभागाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांच्या पुढाकाराने आणि अथक प्रयत्नांतून अवघ्या ४० दिवसांत हे विभागीय कार्यालय उभारण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वीकृत सदस्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत हे सक्षम केंद्र उभे केले. त्यामुळे कोकणातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, वित्तीय सहाय्य, प्रकल्प सल्ला, बाजारपेठ आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहकार्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, जिल्हाध्यक्ष मनीष दळवी, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशीष पेडणेकर, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजन नाईक, मनोज वालावलकर, अॅड. नकुल पार्सेकर, विजय केनवडकर, कुणाल वरसकर, विशाल कामत, मिलिंद प्रभू, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सुनिता फाल्गुने, माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, आनंद बांदिवडेकर, शशी प्रभू, अमित वळंजू आणि अभय वालावलकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सिंधुदुर्गच्या नैसर्गिक संपत्तीचा उद्योगासाठी उपयोग करा : नितेश राणे
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीबरोबरच स्थानिक कौशल्याचा प्रभावी उपयोग करून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कृषीपूरक उद्योग, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा जिल्ह्याच्या विकासाचा भक्कम पाया ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या योजनांशी केंद्र जोडणार
आमदार निलेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या मनोगतात इन्क्युबेशन सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांशी हे केंद्र जोडून अधिकाधिक तरुणांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी आवश्यक मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडविण्याचे लक्ष्य
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार नवे उद्योजक निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाची दमदार सुरुवात सिंधुदुर्गातून झाली असून त्यातून जिल्ह्यात उद्योगक्रांती घडेल, असा विश्वास मानगावे यांनी व्यक्त केला.
डॉ. संतोष राणे यांनी प्रास्ताविकात शासन, महाराष्ट्र चेंबर आणि वित्तीय संस्था एका व्यासपीठावर आल्याने नवउद्योजकांना मोठी ताकद मिळणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबर नवउद्योजक घडविण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून कोकण विभागीय कार्यालय आणि इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात उद्योगनिर्मितीचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहा नवउद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रे
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या उपक्रमात ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानांतर्गत सहा नवउद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. चेंबरच्या पुढाकाराने उद्योजकांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्याची प्रक्रिया सुरू झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाला युनियन बँक ऑफ इंडियाचे मोलाचे सहकार्य लाभले. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक प्रमुख राघवेंद्र बी. एस. यांची विशेष उपस्थिती होती. तसेच युको बँकेच्या पुढाकारातूनही नवउद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कोकणातील उद्योगविकासासाठी महाराष्ट्र चेंबरच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. स्थानिक साधनसंपत्तीला उद्योगाची जोड, तरुणांना रोजगार आणि नवउद्योजकांना आर्थिक व तांत्रिक पाठबळ देत ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानातून कोकण उद्योगनिर्मितीचे नवे मॉडेल ठरेल, असा विश्वास ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशीष पेडणेकर यांनी व्यक्त केला.
