Headlines

ओसरगाव टोलनाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट त्वरित थांबवा…

विनायक राऊत:अन्यथा ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा..

कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी टोल वसुलीचे दर निश्चित झाले असून, या टोलमुळे सिंधुदुर्गवासीयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक भाऊराव राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना ओसरगाव टोलनाक्यावरून प्रवास पूर्णपणे टोलमुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ओसरगाव टोलनाका जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार जिल्हा मुख्यालयात जावे लागते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनाही या मार्गावरून दररोज ये-जा करावी लागते. त्यामुळे टोल वसुली सुरू झाल्यास सिंधुदुर्गवासीयांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे राऊत यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील रायगड जिल्ह्यात छोट्या वाहनांसाठी पहिला टप्पा ६५ रुपये इतका असताना, ओसरगाव टोलच्या प्रसिद्ध झालेल्या दरपत्रकानुसार छोट्या वाहनांसाठी पहिला टप्पा १२५ रुपये आकारला जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गवासीयांची लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रायगडमध्ये ६५ रुपये आणि सिंधुदुर्गमध्ये १२५ रुपये अशी टोल आकारणी सिंधुदुर्गवासीयांना कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. ओसरगाव टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असेही राऊत यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्गवासीयांनी टोलनाका कायमचा बंद करण्याच्या मागणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले असून, त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी पक्षाच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page