Headlines

फोंडाघाट चेकपोस्टवर दोन गायींसह पिकअप ताब्यात

४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

कणकवली : फोंडाघाट पोलीस चेकपोस्ट येथे तपासणी दरम्यान दोन गायींची विनापरवाना व दाटीवाटीने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत दोन गायींसह सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मधु मारुती चौगुले (४२) व मिनाक्षी मधू चौगुले (३५, दोघे रा. बहिरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ ऑगस्ट रोजी रात्री ९:१५ वा. च्या सुमारास फोंडाघाट चेकपोस्टवर पोलीस शिपाई श्रीकांत राठोड व पोलीस कॉन्स्टेबल लांडगे हे कर्तव्यावर असताना फोंड्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप (एमएच ३९ सी ९२५१) तपासणीसाठी थांबविण्यात आली. वाहनाच्या हौदाची पाहणी केली असता दोन गायी बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. जनावरांसाठी चारा – पाण्याची व्यवस्था नसल्याचेही पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वाहनचालकाकडे जनावरांच्या वाहतुकीचा आवश्यक परवाना आहे का, अशी विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर पंचांच्या उपस्थितीत वाहन व जनावरांचा पंचनामा करून दोन्ही गायी व पिकअप ताब्यात घेण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या बोलेरो पिकअपची अंदाजे किंमत चार लाख रुपये, तर दोन गायींची प्रत्येकी १५ हजार रुपये अशी किंमत नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ३० हजार रुपये आहे.

या प्रकरणी मोटार वाहन अधिनियमातील कलम ६६ व १९२ (अ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(d), ११(१)(e), ११(१)(f), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ (अ), ५ (ब), ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक फिर्यादीत म्हटले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.

You cannot copy content of this page