नेटवर्क समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक:सिंधुदुर्गातील आवश्यक ठिकाणी अतिरिक्त टॉवर्स उभारून नेटवर्क क्षमता वाढविण्याचे कंपनीचे आश्वासन..
⚡सिंधुदुर्ग दि.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जाणवणाऱ्या मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्गातील नागरिकांना अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर्स उभारण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नेटवर्क सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या बैठकीस रिलायन्स जिओचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुनील गोसावी तसेच रिलायन्स जिओचे वरिष्ठ अधिकारी राजीव अमिदवार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेटवर्कची सद्यस्थिती, कमकुवत नेटवर्क असलेले भाग आणि भविष्यातील वाढती डिजिटल गरज याबाबत चर्चा झाली. शिक्षण, व्यवसाय, ऑनलाइन व्यवहार, शासकीय सेवा आणि दैनंदिन संपर्कासाठी चांगली मोबाईल व इंटरनेट सेवा अत्यावश्यक असल्याने जिल्ह्यातील नेटवर्क व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त टॉवर्स उभारून नेटवर्क क्षमता वाढविण्याचे आश्वासन रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी दिले.
.
